पावसाळा

कृष्ण सावळ्या श्यामल मेघांनी
आभाळ भरुनी आले
थेम्ब टपोरे आनंदाने धरती
मग ते झेले 

तरुवेल्लींवर वृक्षलतांवर
साज नवा हा चढे
हिरवाई ची तलम मलमल
पसरे चोहीकडे

कोकिळेच्या मधुर स्वराचा
रव कानी पडे
इवली चिमणी आनंदाने
पानोपानी बागडे

नाजुक केशरी प्राजक्ताचा
सडा अंगणी पडे
भरून घ्यावे आपण मग
सौख्याचे हे घडे

खळखळ खळखळ पाणी वाहते
निर्झर ओढ्यांमधूनी
शुभ्र पांढरे पाणी पडते
उंच प्रपातातूनी

पावसाच्या प्रेमात चिंब
होते धरणी
प्रेमाचे अलवार अंकुर
फुलतात तिच्या मनी

तृप्त होऊन जातं तिचं
आभाळाएवढं मन
सुखावून जातात मग
सकलजन

ऋतू नसतो हा
नुसता पावसाळा
हा तर खरा सृष्टीचा
सृजन सोहळा

सौ रेवती शशिकांत 

Comments

Popular posts from this blog

आई