Posts

Showing posts from December, 2018

पावसाळा

कृष्ण सावळ्या श्यामल मेघांनी आभाळ भरुनी आले थेम्ब टपोरे आनंदाने धरती मग ते झेले  तरुवेल्लींवर वृक्षलतांवर साज नवा हा चढे हिरवाई ची तलम मलमल पसरे चोहीकडे कोकिळेच्या मधुर स्वराचा रव कानी पडे इवली चिमणी आनंदाने पानोपानी बागडे नाजुक केशरी प्राजक्ताचा सडा अंगणी पडे भरून घ्यावे आपण मग सौख्याचे हे घडे खळखळ खळखळ पाणी वाहते निर्झर ओढ्यांमधूनी शुभ्र पांढरे पाणी पडते उंच प्रपातातूनी पावसाच्या प्रेमात चिंब होते धरणी प्रेमाचे अलवार अंकुर फुलतात तिच्या मनी तृप्त होऊन जातं तिचं आभाळाएवढं मन सुखावून जातात मग सकलजन ऋतू नसतो हा नुसता पावसाळा हा तर खरा सृष्टीचा सृजन सोहळा सौ रेवती शशिकांत 

आई

आई असते प्रेमाचा वात्सल्याचा धागा बांधून ठेवते एकत्र कुटुंबाचा गाभा तिचं प्रेम तिची माया कधीच आटत नाही सदैव ती आपल्या पाखरांची वाट पाही लहान असताना भरवते काऊचिऊचा घास तेंव्हा तिच्यात असतो साक्षात अन्नपूर्णेचा वास तिच्या हातचा खाऊ तिच्या हातचे जेवण तृप्त तृप्त होऊन जातं शरीर अन मन चूक होताच कधीतरी धपाटा हि घालते नंतर मात्र लगेच कवेत आपल्या घेते आपण मोठं मोठं व्हावं असाच तिला वाटतं ह्याच आशेपोटी मन अहोरात्र झटतं यश मिळताच कौतुकाची पाठीवर देई थाप संकट समयी आधार देई पाठीवर फिरवून हात तिचं जग तिचं विश्व् आपल्याभोवती फिरतं कितीही तिनं दिलं तरी मन होत नाही रितं हळूहळू काळ जातो मोठे होतो आपण तेंव्हा येत असतं आईलाही म्हातारपण सुरकुतलेली तिची काया बघून डोळ्या पाणी येई तेंव्हा आपणच बनायचे असते आईची आई          सौ रेवती शशिकांत

आयुष्य

आयुष्य असतं  साधं सोपं सरळ जस समोर येईल तसं स्वीकारावं क्षण न क्षण इथला मोलाचा मनमुराद जगून घ्यावं   चांगलं काय  वाईट काय  मात्र नेहमी पारखून घ्यावं विवेकाचा लगाम लावून मन स्वैर धावू द्यावं  सौ रेवती शशिकांत

संसारगीत

एकमेकांमध्ये रंगून जावं एकमेकांमध्ये गुंगून जावं लय पकडत ताल सांभाळत संसाराचं गीत  गावं सगळंच असत आपलं तुझं माझं विसरून जावं संसाराचा रथ म्हणजे कसरत ह्याच मात्र भान हवं थोडा रुसवा थोडे भांडण चिडचिड ह्याची खमंग फोडणी विसरून सारे नंतर मात्र करावी एकमेकांची  मनधरणी वेल  बहरे  संसाराची हेच मागणे असते देवा  लडिवाळ हे फुल वेलीचे हा हृदयीचा अमूल्य ठेवा         सौ रेवती शशिकांत               

रंग

  नितळ निळाई आभाळाची. सागर हि निळे निळे कवेत घ्यावे अवघे विश्व विशाल बना हे मना कळे हिरव्या हिरव्या विविध छटा लेवून नटली अवघी सृष्टी चराचरामध्ये निसर्ग देवता पडते आपल्या नेहमी दृष्टी लाल गुलाबी फुले टपोरी बघता मन हे हरखून जाई असो वेगळी प्रत्येक व्यक्ती लाल रक्त हे नसात वाही  हळद पिवळी सोने पिवळे मखमली हे ऊन हि पिवळे क्षणात निघत सूर्यबिंब हि सारा आसमंत उजळे भगवा रंग वैराग्याचा साधू बैरागी अन साध्वीचा तप साधना सन्मार्गाचा दीप उजळे आत्मतेजाचा  रंग जांभळा रानमेव्याचा जांभूळ पिकल्या करवंदाचा दऱ्यादऱ्यातुन शीळ घालुनी मजा घेऊया प्रतिध्वनीचा रंग पांढरा पावित्र्याचा अन मनातील शांततेचा विसर पडून मी पणाचा अवघे रंग एक होण्याचा इंद्रधनू हि प्रगटे नभी सप्तरंगांची होता उधळण रंगून रंगात साऱ्या रंगून जावे अवघे जीवन  By Revati Shashikant...